Ad will apear here
Next
आशावाद आणि इच्छाशक्ती...



हे खरे आहे, की आशावाद दुर्दम्य असतो. तो जिवंत असेल तर कोणत्याही संकटास सामोरे जाण्याची हिंमतही जिवंत असते.  अनेक वाहतूकदारांकडे कामाला असलेल्या ट्रकचालकांना आता घराची ओढ अनावर होऊ लागली असून, संधी मिळताच ते गावाकडे, आपापल्या प्रांतांत रवाना होतील आणि मुंबईसारख्या महानगरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी ट्रक उपलब्ध असूनही चालकांअभावी वाहतूक ठप्प होईल अशी भीती व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती ओढवलीच, तर त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा विचार आधीच करायला हवा, असे मत मी काही मित्रांशी शेअर  केले होते. त्यावरील प्रतिक्रियांमध्ये दोन प्रतिक्रिया महत्त्वाच्या वाटल्या. असे झालेच, तर सरकारी बस आणि इतर सेवांमधील चालक उपलब्ध होऊ शकतील, असे एक मत व्यक्त झाले, तर एसटीचा उपयोग होऊ शकेल असे आणखी एका मित्रास वाटले. पर्याय आहेत; पण ते किती कामास येतील याविषयी शंका आहेतच. त्या शंकेकडे बोट दाखविणारी एक बातमी आजच लगेच वाचावयास मिळाली. हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रातील ही बातमी या शंका गडद करणारी आहे.

देविदास राठोड हे पालघरजवळील मनोर येथील ५५ वर्षांचे गृहस्थ एसटी महामंडळात वाहक (कंडक्टर) म्हणून काम करतात. पालघरहून मुंबईला ये-जा करणाऱ्या बसचे हे वाहक. त्या परिसरातून मुंबईच्या केईएम इस्पितळात येणाऱ्या २५ डॉक्टरांना दररोज या बसमधून आणण्या-नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते ती न चुकता, कर्तव्यभावनेने पारही पाडतात. त्यांचे घर पालघरपासून सुमारे २१ किलोमीटर अंतरावरील गावात असल्याने, बसच्या वेळेआधी पालघरला पोहोचण्यासाठी ते दररोज मुंबई-अहमदाबाद महामार्गावर येऊन एखादा ट्रक वगैरे पकडतात आणि ट्रकचालकाने त्यांना पालघरला सोडले, की यांची एसटी बस डॉक्टरना घेऊन मुंबईकडे रवाना होते. हे असे अनेक दिवस सुरू होते. 

रविवारी मात्र बराच वेळ महामार्गावर ताटकळूनदेखील, पालघरकडे जाण्यासाठी त्यांना एकही ट्रक मिळाला नाही. रस्त्यावर ट्रकवाहतूकच नव्हती. राठोड यांचा जीव खालीवर होऊ लागला. आपण वेळेवर पोहोचलो नाही, तर करोना साथीशी लढणाऱ्या त्या २५ योद्ध्यांना वेळेवर पोहोचता येणार नाही आणि पुढे काय होईल या जाणिवेने ते कासावीस झाले आणि त्यांनी निर्णय घेतला. ट्रकची वाट न पाहता, त्यांनी चालणे सुरू केले. तब्बल २१ किलोमीटर अंतराची पायपीट करून हा ५५ वर्षांचा थकलेला जीव अखेर उशिरा का होईना, पालघरला पोहोचला.

मुंबईकडे येणाऱ्या बसची डबल बेल त्यांनी मारली, तेव्हा त्यांच्या थकव्यावर समाधानाच्या भावनेने मात केली होती. करोना रुग्णांची सेवा करण्यासाठी दररोज याच एसटी बसने ये जा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसच्या कर्तव्यात आपल्यामुळे व्यत्यय येऊ नये. कारण त्यांच्या सेवेची आज गरज आहे, अशा उदात्त विचाराने राठोड यांनी २१ किलोमीटरची पायपीट केली.

आपल्याला आता चालत पालघर गाठावे लागणार हे लक्षात येताच राठोड यांनी गणवेश गुंडाळून पिशवीत घेतला. अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे झालेला चालण्याचा सराव असा कामाला आला, म्हणून राठोड समाधानी आहेत. त्या दिवशी चालत निघण्याआधी त्यांनी पत्नीकडून ग्लुकोजयुक्त पाण्याची एक जादा बाटली घेतली. चालताना वापरावयाचे कपडे अंगावर चढविले, आणि पालघरच्या दिशेने कूच सुरू केली. पालघरला पोहोचताच काही मिनिटांतच गणवेश चढवून ते तयार झाले आणि बस मुंबईला निघाली. दररोज सकाळी सहा वाजता राठोड यांची बस पालघर सोडते आणि दुपारी तीन वाजता पुन्हा दादरहून पालघरकडे निघते. संध्याकाळी पालघरला पोहोचल्यावर पुन्हा एखादा ट्रक गाठून राठोड आपल्या २१ किलोमीटरवरील गावी पोहोचतात...

त्या दिवशी, रविवारी, रस्त्यावर ट्रक दिसला असता, तर राठोड यांची ही अग्निपरीक्षा वाचली असती.
- दिनेश गुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZNQCL
Similar Posts
माणुसकीची कसोटी! करोनाने माणुसकीची परीक्षा घ्यायचे ठरविले आहे. ही परीक्षा संपूर्ण जगभरात एकाच वेळी होणार असल्याने, वंश, धर्म, देश, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या परीक्षार्थींना त्यामध्ये उतरावेच लागेल. ती परीक्षा उत्तीर्ण झालो, की मगच आपण करोनाचा पराभव केला असे म्हणता येईल.
रिक्षा आणि सरकार! सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात; पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे
वर्ल्ड ॲट होम... आभासी मंचावरून जगाला एकत्र आणून करोनाविरोधी लढ्यातील आघाडीच्या वीरांना सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १८ तारखेला जगभर कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे. ‘वन वर्ल्ड : टुगेदर ॲट होम’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम येत्या १८ तारखेला प्रसारमाध्यमांच्या जागतिक मंचांवरून सादर करण्याचा संकल्प
दिवस... पक्ष्यांचा आणि माणसांचा! सकाळ उजाडली, उन्हं अंगावर आली तरी आपापल्या घरट्यात आज पक्ष्यांना जागच आली नाही. कशी येणार? रस्त्यावर आणि आजूबाजूला कुठेही कसलाच आवाजही येत नव्हता. गाड्यांच्या आणि कर्कश्श आवाज करीत पहाटरंगी प्रकाशाला चिरत पळणाऱ्या मोटारसायकलींचा सवयीचा ध्वनी अजून कानावरही पडलाच नव्हता. कॅरियरला लटकावलेल्या दुधाच्या किटल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language